दर खालावल्याने खरेदी साठी गर्दी
| नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत मिरची बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात. या मिरची बाजाराला शंभर वर्षे होत आली आहेत. गेल्या वर्षी ग्राहकांना मिरचीचा जोरदार ठसका बसला होता. मात्र यंदा मिरचीचे दर आवाक्यात असल्याने महावीर पेठेत मिरचीचा ठसका झाला कमी असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, मिरचीचे दर कमी झाल्याने कर्जतची मिरची गल्ली ग्राहकांच्या गर्दीने भरून गेली आहे. दरम्यान, यावर्षी पहिल्यांदा कर्जतमध्ये शंभर वर्षांपासूनच्या मिरची बाजारात यंदा मिरचीचे दर आवाक्यात आहेत.
सुमारे 100 वर्षांपूर्वीपासून कर्जत येथील जुन्या बाजारात कर्जतचा मिरची बाजार भरतोय. शहरातील महावीर पेठेत 10-12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. ही मिरची हैदराबाद वारंगल, आंध्रप्रदेश-गंटूर, तेलंगणा आदी राज्यातून पुण्यात येते आणि तेथून ती कर्जतच्या बाजारात उपलब्ध होते. हल्ली तयार मसाले मिळत असले तरी पहिल्यापासून ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे ते वर्षभरासाठी मसाला करण्यासाठी कर्जतची बाजारपेठ गाठतात. जानेवारी ते मे या कालावधीत ही मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग,पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जतमधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
यंदा किंमती बर्यापैकी असल्याने मिरची घेण्यासाठी मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी दिसते. यंदा मिरचीचे दर आवाक्यात असल्याने अनेक गृहिणींनी मिरची विकत घेताना काटकसर केली आहे. खड्या मसाल्याचे दर स्थिर असल्याने गृहिणींनी हात सैल सोडला आहे. गेल्या वर्षी मिरचीच्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले होते. यंदा मिरचीचे दर कमी झाल्याने व्यापारी वर्गाचा व्यवसाय चांगला होत आहे. असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. गंटूर मिरची गेल्या वर्षी 280 तर यंदा 240 रुपये इतके आहे. लवंगी मिरची 280 तर यंदा 250 रुपये आहे. बेडगी मिरची 700 तर यंदा 450 रुपये आहे. काश्मिरी मिरची 800 रुपये तर यंदा 550 रुपये आहे. संकेश्वरी मिरची आणि पट्टी मिरचीच्या भावात फारसा फरक नाही.त्यामुळे कर्जत येथील मिरची बाजारपेठ हा यावर्षी मिरचीचे दर कमी झाल्याने ग्राहकांची चंगळ झाली आहे. त्यात कर्जत येथील मिरची खात्रीची असल्याने दक्षिण भारतातून येणारी मिरचीला अधिक मागणी असल्याने ग्राहकांची पावले कर्जतकडे वळली आहेत.







