यंदा कार्तिकी यात्रा भरणार,वारकरी आनंदले

पंढरपूर | प्रतिनिधी |
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल वीस महिन्यांनंतर पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च 2020 पासून पंढरपुरात कोणतीही यात्रा भरून शकलेली नाही. त्यामुळे पंढरपुरातील अर्थकारण ठप्प झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने निर्बंध कमी केले आहेत. अशा परिस्थितीत यंदाची कार्तिकी यात्रा भरण्यासंदर्भात शासन काय भूमिका घेणार, याकडे वारकरी आणि स्थानिक व्यापार्‍यांचे लक्ष लागले होते.
कार्तिकी यात्रा भरवावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातून आणि व्यापारी वर्गातून होत होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील यात्रा भरवण्याविषयी पाठपुरावा केला होता. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने यात्रा भरवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी कोरोना नियमांचे पालन करत यात्रा भरण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. या सर्वांची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी यांनी यात्रेच्या अनुषंगाने कोणकोणती दक्षता घेतली जावी, या संदर्भात सविस्तर आदेश पारित केले आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांचे दर्शन, कार्तिकी एकादशीची उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा, एकादशीचा श्री विठ्ठलाच्या रथयात्रेचा सोहळा, नैवेद्य, श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, पंढरपूरला येणार्‍या दिंड्यांचे नियोजन, मठांमध्ये उतरणार्‍या भाविकांची नियमावली, वाळवंटातील परंपरा यांसह विविध बाबींबाबत सविस्तर आदेश काढला आहे.
24 तास दर्शन सुरू…
आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात येणार्‍या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर 24 तास उघडे ठेवले जाते. या परंपरेनुसार श्री विठ्ठल- रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला असून, श्री विठ्ठलाच्या पाठीशी लोड ठेवण्यात आला आहे. यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपुरात यायला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे.

Exit mobile version