हवामान बदल आणि तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने बागायतदार चिंतेत
| वाणगाव | प्रतिनिधी |
सध्या जिल्ह्यात आंब्याच्या झाडाला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढील काही दिवसांतच परिपूर्ण मोहोर येण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली होती. परंतु अचानक जिल्ह्यात बदललेले हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर यंदा आंब्याचा हंगामही कसोटीचा ठरणार आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड व रोगांची समस्या जाणवत आहे. यंदा पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने रब्बीचा हंगामही लांबणीवर गेला आहे.
आंब्याच्या फळबागेत सध्या करपा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवत असून, नवीन मोहोर जळण्यास सुरुवात झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा मोहोर उशिरा येत असून, त्यातच बदलत्या हवामानाचा फटका बसल्यास एकंदरीत आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)अंतर्गत शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देण्यात येत आहेत. यादरम्यान कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे आणि संशोधन सहयोगी योगेश मेंगे (हॉर्टसॅप प्रकल्प) यांनी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आंबा पिकावर 10 तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर याप्रमाणे आर्थिक नुकसान पातळी अधिक आढळल्यास तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे डॉ. अंकुर ढाणे यांनी सांगितले. किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना झाडांची योग्य छाटणी करून बागेत हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील याची विशेष काळजी घ्यावी. बाग तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळून आंबा पिकाचे संतुलित खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.
माझ्या आंबा फळबागेत आंबा पिकावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बागेस भेट देऊन तुडतुडे किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत.- प्रकाश घरत, आंबा बागायतदार, नवली, पालघर.
आंब्यावर आढळणारी तुडतुड्यांची पिल्ले आणि प्रौढ किडे पाने, मोहोर व लहान फळांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे फुलकळ्या व फुले कोमेजून गळून पडतात. नुकतीच लागलेली लहान फळेही मोठ्या प्रमाणावर गळतात. किडीच्या चिकट गोड स्रावावर काळी बुरशी (खार/चिकटा) वाढून प्रकाश संश्लेषणात अडथळा निर्माण होतो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. नुकसान पातळी वाढल्यानंतर महागड्या औषधांची फवारणी करण्यापेक्षा आटोक्यात असतानाच उपाययोजना करणे आवश्यक आहे
डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर
माझ्या आंबा फळबागेत आंबा पिकावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बागेस भेट देऊन तुडतुडे किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत.
प्रकाश घरत, आंबा बागायतदार, नवली, पालघर
