अनुभवाची शिदोरी महत्त्वपूर्ण; भारताची बॅडमिंटनपटू सिंधूचे मत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दुखापतीमुळे गेला काही काळ बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेल्या दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पी.व्ही. सिंधूने दमदार पुनरागमनाचे ध्येय बाळगले आहे. यावर्षी पॅरिस येथे होणार्या ऑलिम्पिकमध्ये पदककमाई करणे आव्हानात्मक असेल याची सिंधूला जाण असून सुवर्णयश मिळण्यासाठी आपल्याला अधिक हुशारीने खेळ करावा लागेल असे तिला वाटते. यासाठी अनुभवाची शिदोरी फायदेशीर ठरेल असे सिंधू म्हणाली.
माजी जगज्जेत्या सिंधूला गेल्या 18 महिन्यांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच तिला दुखापतींचाही सामना करावा लागला आहे. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून पूर्णपणे सावरणार इतक्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले. “2016 आणि 2020च्या तुलनेत यंदा पॅरिस येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा वेगळी आणि अधिक आव्हानात्मक असेल. मात्र, माझ्या गाठीशी आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभव आहे. यंदा यशस्वी कामगिरी करण्यासाठी मला अधिक हुशारीने खेळावे लागेल,’’ असे सिंधू म्हणाली.
“महिला विभागातील अव्वल 10-15 खेळाडू या तुल्यबळ आहेत. त्यामुळे समोर कोणतीही खेळाडू असो, विजय मिळवणे सोपे नसते. तुम्हाला लक्षपूर्वक खेळ करावा लागतो. तुमची पहिली योजना यशस्वी ठरत नसल्यास दुसर्या पर्यायाचा विचार करावा लागतो. तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना काही वेळा काय करावे हे तुम्हाला सूचत नाही. अशा वेळी संयम राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्यक आहे,’’ असेही सिंधूने नमूद केले. सिंधूने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य, तर 2020च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ती अपयशाच्या गर्तेत अडकली आहे. गेल्या वर्षी तिला बहुतांश स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
मी गेल्या तीन महिन्यांत एकही स्पर्धा खेळलेले नाही. त्यामुळे मी पुन्हा खेळणे सुरू करेन तेव्हाच माझी ऑलिम्पिकसाठीची तयारी कशी आहे हे कळेल. प्रशिक्षकांसह मिळून मी जागतिक क्रमवारीतील अव्वल 10-15 खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करत आहे.
पीव्ही सिंधू