यंदाचा समाजभूषण पुरस्कार निवडणुकीच्या कचाट्यात

पुरस्कार देण्याचा सरकारला पडला विसर

| रायगड | आविष्कार देसाई |

महाराष्ट्र सरकारच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे दरवर्षी वितरण करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा झालेला नाही. दरवर्षी प्रशासनाला प्रस्ताव प्राप्त होत आहेत. मात्र, त्याचे वितरण करण्याचा विसर सरकारला पडल्याने विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने यावर्षीचे पुरस्कार रखडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या नावाने पुरस्कार दिले जातात.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडित, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा आणि इतरांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने 1971-72 पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. तर, 1989 पासून संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी या पुरस्काराचे नाव ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार’ असे होते. 2 एप्रिल 2012 च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ असे करण्यात आले आहे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा गौरव करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाकडून प्रस्ताव मागवले जातात. त्यानुसार गेल्या चार वर्षांत प्रशासनाला मोठ्या संख्येने प्राप्त झाले आहेत. मात्र, अद्याप पुरस्कारांची घोषणा व वितरण झालेले नाही. सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने उलट-सुलट राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे समन्वय नसल्यानेच पुरस्कार रखडल्याचे बोलले जाते.

याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही काही सामाजिक संस्थांनी या आधी निवेदन सादर केली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. एकीकडे भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करायचा आणि दुसरीकडेे त्यांच्या नावावर असलेल्या पुरस्काराचे चार वर्षांपासून वितरणच करायचे नाही. हा कसला न्याय असा, सवाल विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे. यावर्षीदेखील पुरस्कारांचे वितरण होण्याची शक्यता कमी आहे. कारण, लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता आधीच सुरु होणार आहे. त्यामुळे पुरस्काराकडे डोळे लावून बसलेल्यांना पुन्हा वाट पाहावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

गेल्या पाच वर्षात 32 प्रस्ताव
2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 या चार वर्षांत एकूण 25 प्रस्ताव प्राप्त झाले होते. तसेच 2022-23 या वर्षीसाठी सात प्रस्ताव आले आहेत. प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळावा यासाठी व्यक्ती, संस्था सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करत आहेत. मात्र, सरकारकडून गेल्या चार वर्षांतील पुरस्कारांचे वितरणच केलेले नाही. यावर्षी 14 एप्रिलच्या आधी पुरस्कारर्थींची घोषणा होणार का, असा प्रश्न पडला आहे.

विविध पुरस्कारांसाठी गेल्या चार वर्षांत 25 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, सरकारकडून पुरस्कांचे वितरण झालेले नाही. यावर्षी सात प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांचे वितरण करण्याबाबतची तारीख सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुनील जाधव, सहायक आयुक्त,
समाज कल्याण, रायगड
Exit mobile version