| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. राऊंड रॉबिन आणि नॉकआऊट पद्धतीने दहा संघामध्ये यंदाचा विश्वचषक होणार आहे. प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राऊंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी 2019 आणि 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. 2019 मध्ये इंग्लंडने, तर 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता. यंदा कोणता संघ विश्वचषक उंचावणार, हे 19 नोव्हेंबर रोजी समजणार आहे.
राऊंड रॉबिन आणि नॉकआऊट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राऊंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप-4 मध्ये पोहोचू शकतो. उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत, तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
या पद्धतीत भारताची कामगिरी
राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामिगिरी निराशाजनक आहे. 1992 मध्ये पहिल्यांदा राऊंड रॉबिन स्पर्धा रंगली होती, तेव्हा भारतीय संघाला टॉप-4 मध्ये स्थान पटकावता आले नव्हते. तर, 2019 मध्ये भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. यंदा भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे, त्यामुळे भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.