धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्यांना अटक

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्या दोघा अन्यप्रांतियांना गुरुवारी (दि. 20) पोलिसांनी अटक केली. तसेच, त्यांच्याकडील 27 हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सुनिलसिंग मनोहरसिंग दुधाणे (म्हैसूर) व गोविंद सिंग भारतसिंग टाक (निपाणी जि.बेळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला शिवजयंतीच्या अनुषंगाने सतर्क राहून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम मार्गावर रस्त्याकडेला दुचाकी लावून दोघे जण हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे छापा टाकला. दुधाणे व टाक यांना पकडून त्यांच्याकडून विक्री साठी आणलेली तलवार, गुप्त्या, खंजीर, सत्तुर कोयते, चाकू असे 27 प्राणघातक हत्यारे, दुचाकी, रोख रक्कम असा 91 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version