। पनवेल । वार्ताहर ।
एटीएम मशीनमधून पैसे काढत असताना एटीएमची अदलाबदली करून बँक खात्यातून 45 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तिविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटीलवाडी शिवमंदिर जवळील साजन औरंग हे 4 जुलै रोजी एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सुरुवातीला दोन वेळा पैसे काढले मात्र तिसऱ्यांदा पैसे काढताना पैसे आलेच नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांचा पिन क्रमांक पाहिला. त्यावेळी त्याने त्यांच्याकडून एटीएम घेतले आणि त्याच्या जवळील बनावट एटीएम कार्ड साजन यांना दिले. ते एटीएम कार्ड घेऊन घरी आले. त्यानंतर 5 जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास पैसे काढल्याचे मेसेज त्यांना आले. त्यांनी एटीएम कार्ड पाहिले असता ते त्यांचे नव्हते. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे कळताच तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.