| मुंबई | वृत्तसंस्था |
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांच्या सोडतीतील 2970 घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) करण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीनुसार अनामत रक्कमेसह प्राप्त 24 हजार 303 अर्जांपैकी 303 अर्ज अपात्र ठरले असून 24 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे सोडतीत आता 24 हजार अर्जदार सहभागी होणार आहेत. सोडतीतील अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी सोडतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी पंतप्रधान आवास योजना, प्रथम प्राधान्य, 15 टक्के एकात्मिक योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण अशा योजनांमधील 5311 घरासाठी 5 सप्टेंबर रोजी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया 17 नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या मुदतीत 31 हजार 433 इच्छुकांनी अर्ज भरले. यापैकी 24 हजार 755 जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले. या अर्जांची छाननी करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2000 हून अधिक घरांसाठी आलेले अर्ज वगळून उर्वरित 2970 घरांसाठीच्या अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 24 हजार 303 अर्जांपैकी 1700 अर्ज अपात्र ठरले होते. या अपात्र अर्जांसाठी आलेल्या हरकतींचा विचार करत सोमवारी 2970 घरांसाठीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 303 अर्ज अपात्र ठरले असून 24 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष सोडतीत 2970 घरांसाठी 24 हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.
प्रथम प्राधान्यमधील 2200 हून अधिक घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती अद्यापही सुरू आहे. ही अर्जविक्री-स्वीकृती शेवटचे घर विकले जाईपर्यंत सुरू रहाणार आहे. त्यामुळे 5311 पैकी 2970 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. मात्र अद्याप सोडतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सोडतीच्या तारखेकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.