घातक रसायनामुळे हजारो मासे मृत

हेदवली नदीतील पाण्याचे प्रदूषण

| सुकेळी | वार्ताहर |

हेदवली व अंबा नदीमध्ये (दि.16) मे रोजी अत्यंत घातक रसायन सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होऊन हजारो मासे मृत झाल्याची घटना घडून काही दिवस उलटले असतानाच पुन्हा एकदा बुधवारी (दि.29) हेदवली येथील नदीच्या पाण्यामध्ये घातक रसायन सोडल्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होऊन हजारो मासे मृत झाल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण हेदवली, वाकण परिसरामध्ये प्रदूषण पसरले आहे. यामागे महामार्गावरुन रसायन घेऊन जाणारे टँकर खांब येथील कालव्याच्या ठिकाणी धुतल्यामुळेच रसायन पाण्यामध्ये जाऊन हे पाणी प्रदूषित होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.

या प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे या ठिकाणी असलेल्या हेदवली, वाकण, पाटणसई, गोडसई, वजरोली तसेच संपूर्ण नागोठणे परिसरातील नागरिकांना प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अत्यंत घातक रसायन पाण्यामध्ये सोडल्यामुळे हजारो मासे मृत झाले असून, नदीच्या पात्राच्या बाजूला असलेली हिरवीगार झाडेझुडपेदेखील पूर्णतः कोलमडून पडलेली आहेत.

याबाबतची माहिती कळताच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहर सुटे, किशोर नावळे, प्रकाश डोबळे, यशवंत शिद, राजेंद्र कोकळे, ग्रामसेवक गोविंद शिद, विठ्ठल इंदुलकर, लक्ष्मण मोहिते तसेच विभागातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन या प्रदूषित झालेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, घातक रसायन नदीपात्रात सोडणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन ऐनघर ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व कोलाड येथील पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. याबाबतीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विभागातील नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version