बाळगंगा नदीत हजारो मासे मृत्युमुखी

माशांच्या मृत्यूचे गूढ कायम, ग्रामस्थांकडून प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

| वावोशी । वार्ताहर ।

डोणवत ते वावोशी फाटा या विभागातून वाहणार्‍या बाळगंगा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने नदीकाठी राहणार्‍या ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून या घटने विरोधात प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्तम गॅलवा स्टिल्स कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी बाळगंगा नदीत मिश्रित झाल्यामुळे पाणी प्रदूषित झाले होते. त्याविरोधात ग्रामस्थांनी तक्रार केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तम गॅलवा स्टिल्स कंपनीला नोटीस काढून 12 लाखाचा दंड बसवून कंपनी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कंपनीने योग्य ती खबरदारी घेऊन हे सांडपाणी संयंत्रण प्रकल्पात अडवण्याची प्रक्रिया सुरू केल्यावरच कंपनी सुरू करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. परंतु आता बाळगंगा नदी पात्रात माशांचे मृत्यू सत्र सुरू झाल्याने नदीकाठच्या वावोशी फाटा, जांभिवली, नारंगी, डोणवत, नंदनपाडा , शिरवली येथील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सर्वत्र माशांचा खच पडला असून पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अरविंद धपाटे यांनी उत्तम ग्यालवा स्टिल्स कंपनी लगत असणार्‍या व वावोशी, जांभिवली, नारंगी, डोणवत, नंदनपाडा या ठिकाणच्या नदी पात्रातील पाण्याचे नमुने तपासले असता ते सामान्य असल्याचे दिसून आले. परंतू मासे मृत्युमुखी कसे पडले याचे गूढ मात्र न उकळल्याने मृत्युमुखी पडलेल्या माशांचा नमुना देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी घेण्यात आला असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अरविंद धपाटे व वावोशीचे मंडळ अधिकारी तुषार कामत यांनी तयार केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे ज्या कंपन्या केमिकल युक्त सांडपाणी नदीपात्रात सोडतात अशा कंपन्यांवर 15 दिवसांच्या आत योग्य ती कडक कारवाई करण्यात आली नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल. असा संतप्त इशारा येथील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. यावेळी दहागाव छत्तिशी विभागाचे प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष संदेश पाटील, दिनेश घाडगे, विक्रांत पाटील, महेश पाटील, संजीत भोसले, सुधाकर पाटील, तुषार कामत, तलाठी माधव कावरखे, सतीश शेवाळे, जतिन मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आज मासे तडफडून मृत्युमुखी पडले. उद्या माणसाच्या जीवाशी खेळाल त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकलयुक्त सांडपाणी सोडणार्‍या कंपन्यांवर तात्काळ कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाहीत.

दिनेश घाडगे
सरपंच जांभिवली ग्रामपंचायत

बाळगंगा नदी ही पेण विभागाच्या टोकापर्यंत वाहते. तसेच वरसई या ठिकाणी बाळगंगा धरण बांधण्याचे काम सुरू असून या नदी काठच्या शेजारी जवळजवळ 40 हून अधिक गावांच्या पाण्याचा स्त्रोत ही बाळगंगा नदी आहे. त्यामुळे असे केमिकलयुक्त सांडपाणी सोडणार्‍या कंपन्यांवर कडक कारवाई जर झाली नाही तर आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही.

संदेश पाटील
अध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण समिती, दहागाव
Exit mobile version