पुरात हजारो गणेशमूर्तींचे करोडोंचे नुकसान

यंदाचा ‌‘सण’ हुकणार; कारखानदार हवालदिल

| पेण | संतोष पाटील |

जेमतेम दीड महिन्यांवर गणेशोत्सव आला असल्याने गणपती कारखान्यांमध्ये लगीनघाई सुरू होती. अशातच अतिवृष्टीमुळे बाळगंगेला आलेल्या पुराचे पाणी गणपती कारखान्यात घुसले आणि वर्षभराची मेहनत पाण्यात गेली. शेकडो मूर्तींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण कशा कराव्यात, हे मोठे आव्हान आता मूर्तीकारांपुढे आहे. यंदाचा सण हुकला तर मोठा आर्थिक फटका कारखानदारांना बसणार आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची निर्मिती करणाऱ्या हातांवरच आज विघ्न आले असून, सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे.

पेण तालुक्याचे अर्थकारण पूर्णतः गणपती व्यवसायाभोवती फिरत असते. जवळपास 1400 ते 1500 गणपती मूर्ती निर्माण करण्याचे कारखाने पेण तालुक्यात आहेत. त्यातील 70 टक्के कारखाने हे ग्रामीण भागातील हमरापूर, वाशी, शिर्की विभागामध्ये आहेत. गेली आठ दिवस हमरापूर विभाग पूर्णतः पाण्याखाली आहे, त्यामुळे या विभागातील जवळपास दीडशे ते दोनशे कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात गणपती मूर्तींचे नुकसान झाले आहे. तशाच प्रकारे वाशी विभाग आणि शिर्की विभागामध्ये स्थिती आहे.

पेण तालुक्यात जवळपास 80 ते 90 कोटींचा उलाढाल या गणपती व्यवसायामधून होत असते. 35 ते 40 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. ऐन भरात व्यवसाय आलेला असताना मुसळधार पावसाने अक्षरशः मिठाचा खडा टाकून कित्येक कारखानदारांचे लाखोंचे नुकसान केलेले आहे. आताच्या घडीचा विचार केल्यास पेण तालुक्यात गणपती व्यवसायाचे झालेले नुकसान हे चार ते पाच कोटींच्यावर असावे. पंचनाम्यांचे काम सुरू असून, त्यानंतरच अधिकृत आकडा समोर येईल. परंतु, यावेळेला मागणीप्रमाणे मूर्ती पुरवता येतील की नाही, याबाबत कारखानदारांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. कारण, गणपती उत्सवाला जेमतेम 50 दिवस शिल्लक राहिले आहेत. तेव्हा मूर्ती कशा तयार होतील, हाही एक प्रश्न कारखानदारांच्या समोर निर्माण झाला आहे.

नवीन मूर्ती करण्याचे आव्हान
गणपती व्यवसायाचे झालेले नुकसान हे चार ते पाच कोटींच्यावर असावे. पंचनाम्यांचे काम सुरू असून, त्यानंतरच अधिकृत आकडा समोर येईल. परंतु, यावेळेला मागणीप्रमाणे मूर्ती पुरवता येतील की नाही, याबाबत कारखानदारांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. कारण, गणपती उत्सवाला जेमतेम 50 दिवस शिल्लक राहिले आहेत. तेव्हा मूर्ती कशा तयार होतील, हाही एक प्रश्न कारखानदारांच्या समोर निर्माण झाला आहे.

दीड महिन्यांवर गणेशोत्सव आलेला असताना आम्ही घेतलेल्या ऑर्डर कशा पूर्ण कराव्यात, हे मोठे आव्हान आमच्यासमोर आवाहन आहे. पुराच्या पाण्यात मूर्तींचे नुकसान झालेय, पण त्या नुकसानीपेक्षा घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायचे आहे. जर मायबाप शासनाने आमच्या नुकसानीचा विचार करून भरपाई म्हणून आम्हाला तातडीने सानुग्रह अनुदान दिल्यास खूप बरे होईल.

अजित लांगी, मूर्तीकार, गावदेवी कलाकेंद्र
Exit mobile version