पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना अलिबाग तालुक्यातील बेलोशी-महाजने रस्त्यावरील पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लागलेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे बेलोशी ग्रामपंचायतीसह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांकडून उमटत आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने या गावाला उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. एक हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यातील काहींनी वैयक्तिक नळ जोडण्या घेतल्या आहेत. तर, काहींना सार्वजनिक नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून बेलोशी-महाजने रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईनला दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे नेहमी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु, गळती लागलेले पाईप दुरुस्त करण्यास ग्रामपंचायत व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, जानेवारी महिना उजाडल्यावर पाणी कपातीचे संकट उभे राहणार आहे. पाणी जपून वापरा असे आवाहनदेखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह बेलोशी ग्रामपंचायतीकडून केले जाणार आहेत. परंतु, रस्त्यावरच गळती लागलेल्या पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागात पाण्यासाठी एक ते दोन किलो मीटर पायपीट करावे लागत आहे. काहींना विकत पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती असतानादेखील बेलोशी-महाजने रस्त्यावरील वाया जाणार्या पाण्याकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत कृषीवल प्रतिनिधीने गावातील काही स्थानिकांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, गावापासून शंभर मीटर अंतरावरील पाईपलाईनला संबधित विभागातील कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे गळती लागली आहे. त्याची समस्या अजूनही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकलेला नाही.
महाजने गावाला उमटे धरणाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविली जात आहे. महाजने-बेलोशी रस्त्यावरील गळती लागलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे केली जाईल. हा प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करून वाया जाणारे पाणी थांबविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीमार्फत केला जाईल.
– शैलेश नाईक, ग्रामविकास अधिकारी, बेलोशी