भरपाईचा अडथळा दूर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिर्घकाळ रखडलेली विमा नुकसान भरपाई आता रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे विमा भरपाई न मिळण्याचा अडथळा आता दूर झाला असून शेतकऱ्यांना विमा दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जागतीक हवामानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना आंबा फळपीक विमा मिळत नसल्याची माहिती आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निदर्शनास आणून दिली.
वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यातील पाच हजार 235 शेतकऱ्यांनी तीन हजार 981 हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविला होता. या शेतकऱ्यांना सात कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती. यापैकी पाच कोटी रुपये डिसेंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. परंतु, रोहा, तळा, पनवेल, खालापूर या तालुक्यातील अनेक शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिले होते. सॉम्पो इन्शूरन्स कंपनीकडून पैसे देण्यास टाळाटाळ झाली होती. ही गंभीर बाब चंद्रकांत मोकल यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या निदर्शना आणून दिली. त्यांना पत्र देऊन माहिती देण्यात आली. याची दखल तात्काळ घेऊन विमा भरपाई तात्काळ देण्याचे आदेश मांढरे यांनाी मुख्य सांख्यिकी प्रमोद सावंत यांना दिले. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना सुचना सावंत यांनी दिल्यावर कार्यवाही जोरात सूरू झाली. दोन दिवसांमध्ये खात्यात पैसे जमा होणार असे लेखी पत्र कंपनीने दिले असल्याची माहिती आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.







