रायगड जिल्ह्यातील 80 नागरिकांचा समावेश; नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन
| रायगड | खास प्रतिनिधी |
केदारनाथ खोर्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाने रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. गौरीकुंड ते सोनप्रयागपर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेले हजारो पर्यटक व यात्रेकरु तेथे अडकून पडले आहेत. त्यामध्ये राज्यातील 120 हून अधिक नागरिकांचा, तर रायगडातील सुमारे 80 यात्रेकरुंचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील किती नागरिक अडकून पडले आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. तेथील स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहोत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. रायगड जिल्ह्यातील जे यात्रेकरू केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष रायगड येथे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याशी 02141-222118, 02141-222097 अथवा 8275153363 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तिथे सरकारकडून कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अडकलेल्या पर्यटक, यात्रेकरुंना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. बदलत्या वातावरणामुळे सर्व घाबरुन गेले आहेत. कुठल्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने कुटुंबाशी संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) आलेल्या हेलिकॉप्टरने दिवसभरात 16 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे. आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, आम्हाला येथून सुरक्षित हलवा, अशी याचना हे नागरिक करीत आहेत. अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांचा समावेश आहे. त्यात महाड येथील उद्योजक गोपाळ मोरे यांचाही समावेश आहे. गोपाळ मोरे यांनी या भूस्खलनात खूप मोठी मदत करुन नागरिकांना जीवदान दिले; मात्र आता ते स्वतःच अडकून पडले आहेत. आम्हाला लवकरात लवकर मदत करून सुटका करावी, अशी मागणी करत आहेत. अडकलेल्या यात्रेकरुंमध्ये रायगड जिल्ह्यातील जवळपास 70 ते 80 यात्रेकरु असून, महाडमधील 20 ते 25 यात्रेकरुंचा समावेश असल्याची माहिती गोपाळ मोरे यांनी फोनवरून दिली आहे. त्यांच्यासोबत पाटील नावाचे गृहस्त आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.