जिल्ह्यातील हजारो शाळा तंबाखूमुक्तीच्या प्रतिक्षेत

आजपर्यंत फक्त 740 शाळा झाल्या तंबाखूमुक्त

| अलिबाग | प्रमोद जाधव |

विद्यार्थीदशेपासूनच तंबाखूमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान रायगड जिल्ह्यात सुरु केले आहे. जिल्ह्यातील 3 हजार 753 शाळांपैकी फक्त 740 शाळांना हे ध्येय गाठता आले आहे. अद्यापही 3 हजार 13 शाळा तंबाखूमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या अभियानाला बसत असल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उद्दिष्टपूर्ती करणे गरजेचे आहे.

तंबाखू खाण्याचे फॅड आता वाढत चालले आहे. नाक्या-नाक्यावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची दुकाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु आहेत. या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची भीती अधिक आहे. तरीही, जिल्ह्यात अलिबाग, रोहा, कर्जत, पेण तालुक्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा धंदा राजरोसपणे चालत आहे. तंबाखू खाण्याने अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. तंबाखू खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत कारवाईदेखील करण्यात आली आहे. तरीसुद्धा तंबाखूचे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहेत. तरुणाई तंबाखूच्या आहारी जाण्याची भीती वाढू लागली आहे. रायगड जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी सरकार व प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शाळेतील मुलांमार्फत तंबाखूमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शिक्षण व आरोग्य विभाग तसेच सलाम मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांमध्ये तंबाखूमुक्त शाळा करण्यास सुरुवात करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय असे 344 तंबाखूमुक्त आरोग्य संस्था आहेत. या संस्थातील डॉक्टरांच्या मदतीने तोंडाचा कर्करोगाची तपासणी केली जात आहे. प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक यांची समिती तयार करून शाळेच्या शंभर यार्डच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. तंबाखू खाणारे शिक्षक व मुख्याध्यापकांविरोधात दंडात्मक कारवाई करणे, शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करणे. घरातील व्यक्तींना तंबाखू सेवनाची सवय लागू नये यासाठी विद्यार्थ्यांमार्फत घराघरात संदेश पोहोचविणे, गावात शाळेच्या परिसरात तंबाखू न खाण्याचे फलक लावणे, संस्थेचे स्वयंसेवक शाळेला भेट देऊन तपासणी करून शाळेला तंबाखूमुक्त घोषित करून शाळेबाहेर तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावणे, अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून शाळेपासूनच तंबाखूविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, माध्यमिक, अनुदानी, विनाअनुदानित अशा एकूण तीन हजार 753 शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2 हजार 565 शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार 59 शाळांची नोंदणी सलाम मुंबई अंतर्गत टोबॅको फ्री स्कूल या ॲपमध्ये करण्यात आली आहे. यापैकी 740 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून, 238 शाळांची मान्यता तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही दोन हजार 694 शाळांची ॲपमध्ये नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

तंबाखूमुक्तीसाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली आहे. केंद्रशिक्षक, मुख्याध्यापकांसोबत चर्चा करूना त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन तंबाखूमुक्तीचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे.

शुभांगी लाड, जिल्हा समन्वय, सलाम मुंबई फाऊंडेशन
तंबाखूमुक्त शाळांच्या संख्येबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या दोन हजार 566 शाळा आहेत. या शाळांपैकी किती शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. त्याचा आकडा देण्यास शिक्षण विभाग उदासीन ठरला आहे. या आकडेवारीबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शाळांमध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा घेऊन तंबाखू सेवनाच्या परिणामांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद
Exit mobile version