सामोसे विक्रेत्याकडून हजारो तरुणांना चुना

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

। पेण । प्रतिनिधी ।

दुनिया झुकती है, सिर्फ झुकानेवाला चाहिए.. या म्हणीचा प्रत्यय जिल्ह्यातील हजारो युवकांना आला आहे. पेण तालुक्यातील एका सामोसे विक्रेत्याने आपल्या आयडियाची कल्पना लढवून हजारो तरुणांना गंडवल्याची बाब प्रसार माध्यमांच्या समोर सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी आणली आहे.

सामोसे विक्रेते संतोष थोरात व भाऊ तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रेल्वे माल गोदामात नोकरीचे आमिष दाखूवन हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची लेखी तक्रार बेकावडे यांनी पेण पोलिस ठाण्यात केली आहे. सदर तक्रार अर्ज दाखल करुन पेण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आणि कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा व फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय दयावा, अशी मागणी केली असल्याचे बेकावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

चार कोटींचा डल्ला
संतोष थोरात आणि त्यांचा भाऊ व अन्य सहकाऱ्यांनी संबंधितांकडून एक ते दीड वर्षांपासून फॉर्म भरुन रजिस्टर नोंद करुन घेतले होते. सुरुवातीस फॉर्म फी म्हणून दोन हजार व प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पेणसह रायगड, मुंबई, ठाणे, कोकण मधील लोकांकडून घेतले आहेत. पंधराशेहून अधिक जणांकडून हजार रुपये घेतल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही बेरोजगार तरुणांना नोकरी दिली नसल्याचे समोर आले आहे. थोरात याने अंदाजे 4 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनात आल्याचे बेकावडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पैसे भरुन अनेक महिने झाल्यानंतर देखील नोकरी मिळत नसल्याने तसेच नोकरी मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने अनेक बेरोजगारांनी फोन केल्यानंतर व प्रत्यक्ष भेट घेतल्यावर काही बेरोजगारांना भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाचे ओळखपत्र दाखवले जाते. तर काहींना नमुना म्हणून ओळखपत्र दिले जाते. त्यानंतर पंचवीस हजार रुपये घेऊन तीन महिन्याचे आत भारतीय रेल्वे कार्यालयाकडून नोकरीचे भरतीचे पत्र आपणास शंभर टक्के मिळेल अशी खात्री देऊन फसवणूक केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात पंधराशे पैकी आजपर्यंत एकाही बेरोजगाराला रेल्वे माल गोदमात नोकरी दिली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरी लावण्याचे शिक्षण, वय असे कोणतेही निकष देखील थोरात याने पाळले नाहीत. काही बेरोजगारांचे सरकारी नोकरी मिळण्याचे वय देखील उलटून गेले आहेत अशा बेरोजगारांकडून देखील फॉर्म भरून पैसे घेण्यात येऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

बेकावडे यांची पत्रकार परिषद झाल्यापासून संतोष थोरात यांचे निकटवर्तीय संदीप, रवी अदी व्यक्ती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर बातम्या लावू नये म्हणून वेगवेगळया प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आठ दिवसापूर्वी एका पिडीत तरुणाने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मदत केली. त्यावेळेला देखील संतोष थोरात यांच्या बाजूनी संदीप नामक व्यक्ती पोलीसांबरोबर हूज्जत घालत होता. त्यावेळेला प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देवा पेरवी यांनी पिडीत तरुणाला साथ दिली तर संदीप नामक व्यक्तीनी पेण पोलीस ठाण्यात देवा पेरवी विरुध्द तक्रारी अर्ज दिला. याचा अर्थ असा की चोर कोतवाल को डाटे या सर्व बाबींचा विचार करुन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्क करुन या प्रकरणात संदीप, रवी या व्यक्तींचा ही हाथ आहे का? अशी ही चौकशी करावी अशी विनंती केली. तसेच पोलीसांनी ज्यावेळेला थोरात याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले असता त्यांनी सदरील पैसे नोकरी लावण्यासाठी घेतले नसुन पक्ष संघटनेच्या खर्चासाठी घेतले असल्याचे सांगितले आहे याचाच अर्थ आतापर्यंत हजारो तरुणांना नोकरी लावतो असे सांगून संतोष थोरात यांनी अक्षरशः तरुणांची फसवणूक केली आहे हे सिध्द होत आहे.

ज्या तरुणांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांनी पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांनी आपली लेखी तक्रार दयावी. त्याचा सखोल तपास करुन फसवणूक करणाऱ्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी न घाबरता न दबावाला बळी पडता पेण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.

देवेंद्र पोळ, पेण पोलीस निरीक्षक
Exit mobile version