कोर्लई किल्ल्याच्या दरवाजावर आढळले धमकीपत्र

पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यासह कुटुंबाला ठार मारण्याची धमकी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्याच्या दरवाज्यावर अज्ञाताने शिवप्रेमी नावाने पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यासह कुटुंबाला ठार मारण्याचे धमकीपत्र चिकटवल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कोर्लई किल्ल्यातील पुरातत्व विभागाचे एमटीस अधिकारी गोकुळ बिऱ्हाडे यांनी रेवदंडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

रेवदंडानजीक मुरूड तालुक्यातील पोर्तुगिज कालीन कोर्लई किल्ला आहे. भक्कम बांधकामाचे व तसेच पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला कुंडलिका खाडीचे डोळयाचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य यामुळे हा किल्ला पहाण्यासाठी पर्यटक व स्थानिक यांची नित्याने गर्दी असते. कोर्लई किल्ला भारतीय पुरातत्व विभागाचे अखत्यारीत असून पुरातत्व विभागाचे कर्मचारी या किल्ल्याची देखभाल करतात. हा किल्ला सायकांळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत बाहेरील व्यक्तींसाठी नेहमी बंद केला जातो.

25 डिसेंबर रोजी कोर्लई किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूला बंद असणाऱ्या लाकडी दरवाजाच्या फळ्या काढून अज्ञातांनी नुकसान केले. त्या दरवाजावर, हे गेट तुम्ही बंद केलेत तर तुमची खानदानी नष्ट करू, पोरा सकट व गेट सकट तुमची घरे पण जाळून टाकू, असे लेखी धमकीपत्र शिवभक्त नावाने चिकटविण्यात आले आहे. याबाबत कोर्लई किल्ल्यातील पुरातत्व विभागाचे एमटीस अधिकारी गोकुळ सुखदेव बिऱ्हाडे यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पुळेकर करत आहेत.

कोर्लई किल्ल्याचा दरवाजा बंद करण्याचा आमचा निर्णय नाही. पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार सायकांळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोर्लई किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात येतात. हा नियम किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वांसाठी समान आहे.

गोकुळ बिऱ्हाडे,
पुरातत्व विभाग अधिकारी
Exit mobile version