मांडला ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
। कोर्लई । वार्ताहर ।
गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरावर अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असून, याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. गावाला उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.
याबाबत आपण लवकरच ग्रामस्थांच्यावतीने स्थानिक आमदार, पालकमंत्री, माजी आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व मुरुड तहसीलदार यांना एक निवेदन सादर करणार असल्याचे मुरूड तालुका चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश नांदगावकर व रोहिदास उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर महाडिक यांनी म्हटले आहे.
मांडला ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 188 /2अ मध्ये क्षेत्र 56.65.00 व 49.95.00 त्याचप्रमाणे पारगाण गट क्रमांक 36 मध्ये जवळ जवळ सहाशे एकर वनक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे हजारो झाडांची कत्तल करून कित्येक हेक्टर क्षेत्रात 10 ते 15 पोकलेन व जेसीबी या अत्याधुनिक यंत्रसामुग्र ने रात्रंदिवस दगड मातीचे अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे. असेच उत्खनन सुरू राहिल्यास पुणे जिल्ह्यात घडलेली माळीण दुर्घटना व महाड रायगडमध्ये तळीये गाव दुर्घटना याठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत, तहसील कार्यालय-मुरुड, उपविभागीय कार्यालय अलिबाग, वनविभाग व जिल्हाधिकारी रायगड यांचे दुर्लक्ष दिसून येत असून, अशा कामाला संबंधिताचा वरदहस्त तर नाही ना? असा सवाल उठत आहे.
शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून वेळीच उपाययोजना करण्यात न आल्यास माळीण, तळियेसारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. मग याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकार्यांची राहील, असे मांडला येथील मुरुड तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश नांदगावकर यांनी म्हटले आहे.