दुबईला गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
| कर्जत | प्रतिनिधी |
सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जानेवारी 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत नेरळ-ममदापूर, कर्जत येथे घडली. आरोपीने इन्स्टाग्राम ॲपद्वारे एका पीडित महिलेसोबत ओळख वाढवली. ही महिला एकटी राहत असल्याचे समजल्यावर त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि तिला लग्नाचे वचन दिले. आरोपीने महिलेला नेरळ येथील फ्लॅटवर बोलावून घेतले. तिथे त्याने तिला चहामध्ये गुंगीकारक औषध मिसळून पाजले आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने तिला जम्मू-काश्मीर, हरियाणा, वृंदावन-दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा विविध ठिकाणी फिरायला घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिच्यावर अत्याचार केले. काही काळानंतर आरोपी दुबईला निघून गेला. दुबईतून तो पीडित महिलेला वारंवार फोन आणि व्हिडिओ कॉल करून पैशांची मागणी करू लागला. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि तिचे व त्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
