अवकाळीमुळे शेतकरी धास्तावले
रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरात भात कापणीचे काम सुरू झाली आहेत. यंदा दुबार भाताचे पीक चांगले आल्याने शेतकरी आनंदात आहे. मात्र मंगळवारी(ता.2) परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली. खराब हवामान, अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाईल, या भीतीने शेतकरी धास्तावले असून कापणी केलेला भात भिजू नये, म्हणून खबरदारी घेत आहे.
नदी काठच्या गावातील शेतकऱ्यांना पाताळगंगा आणि रिस नदीच्या पाण्याचा, वासांबे- मोहोपाडा येथे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा याशिवाय जांभिवलीतील शेतकऱ्यांना माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाच्या पाण्याचा आधार आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. यंदाच्या हंगामात परिसरातील शेतकऱ्यांची भात लावणीची कामे फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात वेळेत पूर्ण झाली. सुरुवातीला पेरणी, रोपांची वाढ आणि त्यानंतर लावणीसाठी दीड-दोन महिने अनुकूल आणि पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली झाली असून काही ठिकाणी कापणीही सुरू करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात रसायनी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या, तसेच वासांबे मोहोपाडामध्ये सकाळी हलक्या सरी पडल्या. पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, मात्र शेतकऱ्यांची तसेच वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली. सध्या तापमान वाढले असून ढगाळ वातावरणामुळे उष्माही वाढला आहे. त्यातच अधूनमधून पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.







