| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची प्लास्टिक पिशव्यांच्या अवैध वापराबाबत तपासणी आणि दंडात्मक कारवाई सुरु असताना एका व्यक्तीने अचानक घटनास्थळी येऊन त्यांना धक्काबुक्की केली. तसेच, शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार उसरोली ग्रामपंचायत अधिकारी चैतन्य खैरनार व ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामपंचायत हद्दीत प्लास्टिक पिशव्यांवरील सरकारी कारवाईसाठी येथील ईश्वरी वडापाव दुकानात गेले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार गावात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याने ही तपासणी केली जात होती. तपासणीदरम्यान दुकानात प्लास्टिक पिशवी आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई सुरु होती. याचवेळी कैलास पाटील नावाचा व्यक्ती तिथे येऊन सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून त्यांना दमदाटी करू लागला. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी हे सरकारी कामकाज करत असल्याचे माहित असूनही, कैलास पाटील या व्यक्तीने मुद्दाम त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात कैलास पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुरुडचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकुश सोळसे हे करीत आहेत.






