महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी; माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

। माणगाव । वार्ताहर ।
हाताबुक्क्यानी मारहाण व शिवीगाळी करून फिर्यादी महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार, दि.10 जुलै रोजी 9 वाजता माणगाव तालुक्यातील निळज आदिवासीवाडी येथे घडली. याबाबतची फिर्याद विमल प्रकाश हिलम (40) रा. निळज आदिवासीवाडी, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी विमल प्रकाश हिलम व आरोपी सुरेश बळीराम हिलम हे एकच गावातील निळज आदिवासीवाडी येथील रहिवासी असून, आरोपी सुरेश हिलम हा दारू पिऊन येऊन गावात कोणालाही काहीएक कारण नसताना शिवीगाळी करत असे. म्हणून गावात दि.10 जुलै रोजी रात्री मीटिंग चालू असताना घटनेतील साक्षीदार प्रकाश रामा हिलम (45) रा. निळज आदिवासीवाडी हे आरोपी सुरेशला बोलले की, तू दारू पिऊन येऊन कोणालाही शिवीगाळी करत जाऊ नकोस. त्या गोष्टीचा आरोपी सुरेश यास राग आल्याने तो साक्षीदार प्रकाश रामा हिलम यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादी विमल प्रकाश हिलम या त्यांची भांडणे सोडवण्याकरिता गेल्या असता आरोपी सुरेश याने फिर्यादी महिलेला हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी करून लाथ मारून जमिनीवर खाली पाडून त्याच्या हातातील लाकडी काठी फिर्यादी महिलेच्या पाठीत मारून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेत फिर्यादी महिला ही जखमी झाली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात येऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. दोडकुळकर हे करीत आहेत.

Exit mobile version