उरणमधून तीन अर्ज दाखल

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी (दि. 20) महाविकास आघाडीच्या वतीने पहिल्याच दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

जासई जिल्हा परिषद गणातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, तर जासई पंचायत समिती गणातून उरण पंचायत समितीचे माजी सभापती व शेकापचे ज्येष्ठ नेते नरेश घरत यांच्या पत्नी निर्मला नरेश घरत तसेच चिर्ले पंचायत समिती गणातून शेकापचे युवा नेते दीपक मढवी यांच्या पत्नी व माजी सरपंच प्रियंका दीपक मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सोमानी यांच्याकडे दाखल केले.

उरण तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तसेच इतर मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच कीर्तीनिधी ठाकूर, बी.एम. ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गणांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, उमेदवार निश्चितीसाठी वेळ लागल्याने 16 ते 19 जानेवारीदरम्यान एकही अर्ज दाखल झाला नव्हता. 21 जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, 20 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास वेग आला आहे. मंगळवारी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

Exit mobile version