ज्वेलर्समध्ये चोरी करताना तिघांना अटक

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स चालकाला दागिने दाखवायला सांगायचे आणि ते चोरून न्यायचे याबाबत खांदेश्‍वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


कामोठे येथील राधिका ज्वेलर्स नावाचे दुकान असून यावळी आरोपींनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून या दुकानात अडतीस ग्राम सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. तर खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील कृष्णदेव सूर्यवंशी यांच्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये दोन अनोळखी महिला सोन्याच्या वाट्या खरेदी करण्यासाठी आल्या. वाट्या दाखवत असताना ती पाहिली व आवडली नाही असे बोलून वस्तू ठेवल्यासारखे करून त्या निघून गेल्या. दुकानातील स्टॉक चेक केला असता वीस हजार रुपये किंमतीची सोन्याची वाटी सापडून आली नाही. याबाबत खांदेश्‍वर आणि कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला, निलेश पवार, योगेश्‍वर ठाकूर, तुषार चौधरी व त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. कामोठे पोलिसांनी बदलापूर येथून संगीता सुदर्शन खीची (वय 49), सुनील प्रकाश साळुंखे (वय 41) व विनोद प्रकाश साळुंखे (48 सर्व रा. बदलापूर, कात्रप) यांना अटक केली. त्यांच्याकडून कामोठे, खांदेश्‍वर आणि डोंगरी पोलीस स्टेशन येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून तिन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Exit mobile version