| खोपोली | प्रतिनिधी |
शहरातील क्रांतीनगर येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन स्कुटी आणि एक मोटार सायकलला आग लावल्याची घटना शुक्रवारी (दि.24) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकींवर पेट्रोल टाकून आग लावली असल्याचा संशय नागरिकांनी पोलिसांकडे संशय व्यक्त केला आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त करीत कडक कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली शहरतील क्रांतीनगर वस्तीतील दत्ता बिरेदार यांच्या घरासमोर तिन्हीही दुचाकी वाहने उभी होती. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून आग लावली. शेजारील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्त केला तरी आगीत दत्ता पिरप्पा बिरेदार यांच्या दोन आणि सुळेमान शेख यांची एक दुचाकी जळून खाक झाली. याबाबत पंचनामासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहाने व पथकाजवळ येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे.
संशयित व्यक्ती ही क्रांतीनगर मधलीच राहणारी असून अनेकदा पोलीस ठाण्यात या इसमाबाबत तक्रारी करण्यात आल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. खोपोली पोलिस ठाण्यात या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शितलकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपपोलिस निरिक्षक अभिजीत व्हारांबळे करीत सुरू आहे.