| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथील शार्लोट लेक या ठिकाणी पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत असताना रविवारी तिघे जण बुडाले होते. रात्री उशिरा हेल्प फाउंडेशन ही आपदा संस्था आणि माथेरानमधील सह्याद्री आपदा मित्र यांनी त्या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख अशी मृत तरुणांची नावे आहेत.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, अंधार पडल्याने आपदा संस्थेला अन्य दोघा तरुणांचा शोध घेण्यात अडथळे येत होते. गुरुनाथ साठलेकर यांच्यासोबत खोपोली, खालापूर येथून अनेक आपदा मित्र माथेरान येथे रात्री नऊ वाजता पोहचले. त्यानंतर टॉर्च यांच्या उजेडात हेल्प फाउंडेशनचे आपदा मित्र शार्लोट लेकमध्ये उतरले. त्यांनी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याबाबत शासनाचे वतीने अधिकृत माहिती कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी जाहीर केली. ते तिन्ही मृतदेह माथेरान शहरातील नगरपरिषदेच्या बी जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. त्या मृतदेहांचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह त्या तिन्ही तरुणांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले.






