| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीपैकी तीन जणांना गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पनवेल शहर परिसरात घरफोडी झाल्याच्या घटनांच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या सामानाच्या खोलीची खिडकी उचकटून त्या वाटे घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाटाचे दरवाजे उचकटून व लाकडी बेडमध्ये ठेवलेले चाळीस लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडींचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पो.हवा.दिपक डोंगरे, सागर रसाळ, अजिनाथ फुंदे, लवकुश शिंगाडे, प्रसाद घरत आदींच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीासीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून आले. या गुन्ह्यातील तीन आरोपींना भाईंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये ललित शाही (33), किशोर शाही (29), शेर शाही (35) यांचा समावेश असून त्यांनी त्यांचे सहकारी आरोपी भरत यादव व विष्णु शाही यांच्यासह चोरी केल्याचे कबूल केले.






