। पोलादपूर । शैलेश पालकर ।
मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी (दि.7) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालकासह तीन डीएड्च्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनूसार खेडकडून भोरकडे आयवा डंपर राख घेऊन जात होता. यावेळी कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर ब्रेक दाबल्यावर डंपर पलटी झाला. याचवेळी डंपरजवळून जाणार्या रिक्षेवर राखेचा ढिगारा कोसळून रिक्षाचालकासह तीन डीएडच्या विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यानंतर राज्यसरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात आल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरवरून दिली असल्याचे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे. याप्रकरणी दारू पिऊन वाहन चालविण्णार्या डंपर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 व सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाच्या सुरूवातीलाच चोळई गावाच्या हद्दीत मोठया प्रमाणात अपघात प्रवणक्षेत्र अस्तित्वात असल्याने अनेक अपघात घडले आहेत. चौपदरीकरणानंतरही या अपघातप्रवण क्षेत्राची तीव्रता कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागासह सर्व यंत्रणांना अपयश आल्याने अपघातांचे सातत्य कायम राहिले आहे.
सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास खेडकडून भोरकडे राख घेऊन जाणारा आयवा डंपर (क्र.एमएच 12 एमव्ही 3738) चालविणारा चालक मधुकर तुळशीराम वाघमारे (वय 50, रा.वडगांव हाळ, ता.भोर, जि.पुणे) हा दारु पिऊन कशेडी घाटातून डंपर चालवित होता. यावेळी चोळई गावाच्या हद्दीमध्ये तीव्र वळण उतारावर डंपर पलटी झाला. काही क्षणात गाडीतील राखेचा ढिगारा रिक्षेवर कोसळला. डंपर चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघाताच्या आवाजाने चोळईतील ग्रामस्थ रस्त्यावर आल्याने त्याला तेथून पळून जाण्यात यश आले नाही.
यावेळी डंपरमधून कोसळलेल्या राखेच्या ढिगार्याखाली एक रिक्षा असल्याचे चालकाने प्रत्यक्षदर्शींना सांगितले. तातडीने बचावकार्यासाठी महामार्ग मृत्युंजय दूतांसह महामार्ग पोलीस आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, महाड उपविभागीय पोलीस अधिक्षक निलेश तांबे, महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अवसरमल, पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास तसेच तातडीची मदत व तपास कार्यात मार्गदर्शन केले.
या अपघातात रिक्षा (एमएच 06 बी.व्ही. 2313) चालक अमाज उमर बहूर (वय 46 वर्षे, रा.गोरेगांव, ता.माणगांव, जि.रायगड), खेड येथे डीएडची परिक्षा देऊन परतणार्या विद्यार्थिनी हानिमा अब्दुल सलाम पोपेरे (वय 23, रा. नांदवी, ता.माणगांव), अलिया सिद्दीक बहूर (वय 20, रा.गोरेगांव, ता.माणगांव) आणि नाजनीन मुकीद करबेलकर (वय 22 वर्षे, रा.वावे, ता.पोलादपूर) यांचा मृत्यू झाला.
5 लाखांची मदत जाहिर
या अपघाताची खबर कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मृताच्या वारसांना 5 लाख रूपये सानुग्रह मदत जाहिर केल्याचे ट्विट रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. महाडचे आ.भरत गोगावले यांनीही माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह तातडीने ग्रामीण रूग्णालयामध्ये मृतांच्या आप्तपरिवाराची भेट घेतली.