अतिवृष्टीचा इशारा,ऑरेंज अॅलर्ट जारी
। मुंबई । प्रतिनिधी ।
देशभर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत मात्र, धुमाकूळ घातला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत मंगळवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत राम मंदिर येथे 78 मिमी असा 24 तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कु लाबा येथे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 25.5 मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान 31.1 आणि कि मान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, नवी मुंबईत बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळपासून पावसाची संततधार कायम असून, महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे रस्त्यावर धुके पसरल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. पावसाची संततधार कायम असल्यानं मुंबईतील सायनसह अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम प्रवासी रेल्वेवर झालेला नाही.