। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून दोन महिला व एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत लता शशिकांत कदम (35), त्यांचा मुलगा लक्ष्मण कदम (8) तसेच मुलाची आत्या रेणुका धोंडिराम शिंदे (45) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन महिला कपडे धुण्यासाठी खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर असलेला लक्ष्मण हा आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे मुलाची आई लता यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी डोहात उडी घेतली. यावेळी चिमुकल्याने त्यांना पाण्यात ओढल्याने तीही बुडू लागली. हे दोघेही पाण्यात ओढले गेल्याचे लक्षात येताच रेणुका यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि तिघांचाही डोहात बुडून मृत्यू झाला.
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले तिघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नदीत दुर्घटना घडल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी नदीच्या डोहातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी हजर होत तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खडपोली रामवाडी गावात शोककळा पसरली आहे.







