। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील मौजे पुगाव गावाच्या हद्दीत दुचाकीने इको कारला जोरदार धडक दिली. हा अपघात नम्रता गार्डन समोर गुरुवारी (दि.25) सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास घडला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसतांना त्याच्या स्वतःच्या ताब्यातील दुचाकीने ट्रिपल सीट घेऊन गोवा बाजुकडून मुंबईकडे जात होता. दरम्यान पुगाव गावाच्या हद्दीत नम्रता गार्डन समोर आले असता मुंबईकडून गोवाबाजूकडे जाणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रामनाथ जयराम हिलम (वय 22, रा. चिवे जांभूळ पाडा), संजय रामु वाघमारे (16) आणि अजय रामू वाघमारे (21) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.
या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.ए.पाटील पाटील करीत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील गोवे, पुई, पुगाव दरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावे. अन्यथा कोणाचाही नाहक बळी जाऊ शकतो, असे प्रवासी वर्गातून व्यक्त केला जात आहे.







