गुंतवणुकीच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।
नोकरीच्या शोधात असलेल्या एका व्यक्तीला भामट्याने गुंतवणुकीचे आमिष दाखवून 3 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भरतकुमार भानुशाली हे वर्षभरापूर्वी इंटरनेटवरून नोकरी शोधत होते. यावेळी त्यांना एक जाहिरात निदर्शनास आली. त्यांनी जाहिरातीमधील नंबरवर संपर्क साधून नोकरीसंदर्भात विचारणा केली. समोरच्या व्यक्तीने आपले नाव प्रकाश सांगून त्याच्या वेबसाईटवरील वस्तुमध्ये रक्कम गुंतवल्यास त्यावर कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानंतर आपल्या कंपनीची लिंक पाठवून त्यात तपशील व 238 रुपये भरण्यास सांगितले, त्याप्रमाणे भानुशाली यांनी माहिती व रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यात 365 रुपये जमा झाले.

त्यामुळे भानुषाली यांनी अ‍ॅपमध्ये सुरुवातीला 9500 रुपये भरले. त्यानंतर प्रकाशने त्यांच्या खात्यात कमिशन व मूळ रकमेसह 10,800 रुपये पाठवून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यामुळे भानुशाली यांनी प्रकाश सांगेल त्यानुसार पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. प्रकाशने भानुशाली यांना पुन्हा एक लिंक पाठवून त्यात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यामुळे भानुशालींनी 3 लाख 20 हजार रुपये गुंतवले, मात्र भामट्याने त्यांच्या खात्यात एक रुपयाही पाठवला नाही.

Exit mobile version