तटरक्षक दलाच्या कारवाईनं खळबळ
| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय तटरक्षक दलानं मुंबईजवळ समुद्रात मोठी कारवाई केली आहे. तेलाची तस्करी करणारी तीन जहाजं तटरक्षक दलानं पकडली आहेत. या जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा होता. ही परदेशी जहाजं समुद्रात तेलाची तस्करी करत होती. शुक्रवारी एका जटिल समुद्र-हवाई नेटवर्कवर आधारित ऑपरेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
रॅकेटचा भाग असलेल्या जहाजांनी संघर्षग्रस्त देशांमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आणि तेल आधारित वस्तूंची तस्करी करुन आर्थिक फायदा कमावण्याचा मार्ग निवडला होता. ही जहाजं आंतरराष्ट्रीय समुद्रात वस्तूंची देवाणघेवाण करायची. या सिंडिकेटमध्ये काम करणारे हस्तक अनेक देशांमध्ये सक्रिय आहेत. जहाजं खोल समुद्रात असताना त्यांच्यात समन्वय राखण्याचं काम हस्तकांकडून केलं जातं.
गुरुवारी मुंबईपासून जवळपास 100 नॉटिकल मैलांवर पश्चिम दिशेला भारतीय तटरक्षक दलानं तीन जहाजं थांबवली. तटरक्षक दलाचे कर्मचारी या जहाजांवर गेले. त्यांची झडती घेण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. चालक पथकाची चौकशी केली गेली. त्यातून जहाजांचा वापर तेलाच्या तस्करीसाठी होत असल्याचं स्पष्ट झालं.
भारतीय तटरक्षक दलाच्या टेक-इन्क्लुसिव्ह सिस्टिमनं एका मोटर टँकरचा शोध घेतला. या टँकरच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे जहाजाच्या हालचालींचा डिजिटल तपास सुरु करण्यात आला. त्या जहाजाच्या आसपास असलेल्या अन्य जहाजांचा डेटा पॅटर्न तपासण्यात आला. दोन अन्य जहाजांवरील हालचालीदेखील संशयास्पद आढळून आल्या. त्यांच्याकडून समुद्रात तेलाशी संबंधित वस्तूंची तस्करी सुरु होती. ही जहाजं भारताच्या सागरी सीमा असलेल्या राज्यांमधील शुल्क चुकवण्याचा प्रयत्न करत होती.
भारतीय तटरक्षक दलाच्या पथकानं जहाजांवर जाऊन डिजिटल पुरावे तपासले. त्यानंतरही तीनही जहाजं ताब्यात घेण्यात आली. पुढील कारवाईसाठी या जहाजांना मुंबईत आणलं जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारतीय सीमा शुल्क विभागाकडून केला जाईल. समुद्र किनारा लाभलेल्या राज्यांकडून कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी जहाजांची ओळख वारंवार बदलली जायची. या जहाजांचे मालक परदेशी नागरिक आहेत.
