तीन नवे खेळाडू संघात दाखल

। मुंबई । वृत्तसंस्था ।

टी-20 वर्ल्डकपनंतर लगेचच होणार्‍या झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयकडून संघात बदल करण्यात आले आहेत. झिम्बाब्वे मालिकेसाठी भारताने वर्ल्डकप सुरू असतानाच संघ जाहीर केला होता. पण आता या संघात साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. कर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आले होते. दरम्यान, या मालिकेसाठी टी-20 विश्‍वचषकातील संघामधील एकूण 5 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच अडकला असल्याने भारतात परतलेला नाही. त्यामुळे संघात अचानक बदल करणे भाग पडले आहे. पहिल्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे यशस्वी जैस्वाल यांची जागा घेतील. हे तीन खेळाडू प्रथम संपूर्ण संघासह भारतात येतील आणि त्यानंतर मालिका खेळण्यासाठी हरारेला रवाना होतील.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्‍या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्‍नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा यांचा समावेश आहे.
Exit mobile version