अवयवदानातून तीन रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अनंत रेवाळे कुटूंबाचा पुढाकार

| मुंबई | प्रतिनिधी |

‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ या उक्तीला खऱ्या अर्थाने साकार करणारा एक प्रेरणादायी प्रसंग महाड तालुक्यातील खैरे गावातून समोर आला आहे. खैरे गावचे भूमिपुत्र तसेच वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय अनंत रेवाळे यांचे मंगळवारी (दि.20) वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या संमतीने यकृत व दोन्ही मूत्रपिंडांचे अवयवदान करण्यात आले. या धाडसी व मानवतावादी निर्णयामुळे तीन रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असून, ग्रामीण भागातून अवयवदानाच्या चळवळीत एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. अनंत रेवाळे यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

डॉक्टरांच्या मते, भारतात अवयवदानाचे प्रमाण अजूनही अत्यंत कमी आहे. धार्मिक गैरसमज, भीती आणि जनजागृतीच्या अभावामुळे अनेकवेळा मृत्यूनंतरही अवयवदान केले जात नाही. परिणामी योग्य वेळी अवयव न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. मात्र परदेशात अवयवदानाचे प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे आज अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना नवे जीवन देणे शक्य झाले आहे. मंगळवारी बंगळुरू ते नवी मुंबई दरम्यान उभारण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवांची वाहतूक अत्यंत वेगाने व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यात आली.

अनंत रेवाळे हे महाड तालुक्यातील खैरे गावचे रहिवासी होते. ते वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई आणि नातवंडांचा परिवार आहे. रेवाळे कुटुंबाने घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, मृत्यूनंतर अवयवदानाबाबत समाजात व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ग्रीन कॉरिडॉरमुळे जीवनदायी मोहिमांना गती
ग्रीन कॉरिडॉरसारख्या व्यवस्थेमुळे वेळेत जीवनदायी मोहिमांना गती मिळते. एखादी व्यक्ती ‌‘ब्रेन डेड‌’ घोषित झाल्यानंतर हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, आतडे तसेच त्वचा, डोळे (कॉर्निया) आणि विविध ऊती दान करता येतात. अशा अवयवदानामुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण होतो.

झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वितरण करण्यात आले आहे. या अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळाले.

– संगीता देसाई, प्रशासकीय अधिकारी व ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर

Exit mobile version