विषारी औषध प्राशनाने तिघे दगावले; सुधागड तालुक्यातील घटना

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील तिघांचा औषध पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पाली पोलिस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तीन वेगवेगळ्या घटनेत कानसळ येथील एकाने झाडाला फवारणी करणारे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कानसळ येथील सुरेश सखाराम घोगरकर यांनी झाडाला फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती झाली, उपचारासाठी त्यांना रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलीबाग येथे दाखल करण्यात आले होते. मात्र शरीरात मोठ्या प्रमाणावर विष भिनल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दुसर्‍या घटनेत पाली येथील तरुण सत्यवान मधुकर पेडणेकर याने नैराश्यातून उंदीर मारण्याचे औषध पिऊन जीवन संपवले. सत्यवान याला उपचारासाठी एमजीएम पनवेल कामोठे येथे दाखल केले होते, मात्र अधिक विष भिनल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाली पोलिस स्थानकात 8/2023 नुसार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सचिन पालकर करीत आहेत.
तिसर्‍या घटनेत जांभुळपाडा येथील रहिवासी सुरेश नामदेव पंडित (वय 54 )याने धोत्र्याचे पान खाल्याने मृत्यू झाला. सुरेश पंडित याला उपचारासाठी एमजीएम पनवेल कामोठे येथे दाखल आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक कांचन भोईर करीत आहेत.

Exit mobile version