महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसचा अभाव; रुग्णांना माणगाव रुग्णालयात केले दाखल
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडीमधील एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील अनेक लोकांना जखमी केले. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी झाल्याने रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने कुर्ला गायकरवाडी गावातील धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार व अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत केली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, महाड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याचे समझले. अखेर महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (दि.२०) पहाटे तीनच्या सुमारास नेण्याची वेळ आली. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
केवळ रुग्णालयाच्या इमारती बांधण्याचे काम काढायचे व प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी व औषध उपचाराचा साठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, असे प्रकार चालू आहेत. आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पिसाळलेल्या कुत्र्याच्या अँटी रेबीज सीरमची लस महाड रूग्णालयात आयसीयू कक्ष नसल्यामुळे ठेवता येत नाही. परंतु, जर का रुग्णांना द्यायची झाली तर आम्ही अलिबाग, माणगाव, पेण या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, असे महाड वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनु डोईफोडे यांनी सांगितले.





