वाकसमध्ये सरत्या पावसामुळे घराची भिंत कोसळून तिघे जखमी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील वाकस कातकरी वाडीमधील एका आदिवासी कुटुंबाच्या घराची भिंत बुधवारी (दि.19) कोसळली. सरत्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे ऐन दिवाळीत त्यांच्यावर संकट आल्याने आदीवासी कुटूंब हतबल झाले आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून जखमींवर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून जखमींपैकी महिला गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाकस ग्रामपंचायतमध्ये कशेळे रस्त्यावर कातकरी लोकांची वस्ती असून तेथे मंगल भोईर हे कातकरी कुटुंब राहतात. 19 ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाचा जोर वाढला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंगल भोईर यांच्या विटा मातीच्या घराची भिंत कोसळली. पावसाचा जोर असल्याने त्यांचे कुटुंब ज्या आडोशाला बसले होते, अगदी त्याच बाजूला ती भिंत कोसळली आणि मातीच्या ढिगार्‍यात भोईर कुटुंबातील तिघे काहीकाळ दबले.भिंत कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली आणि त्या ठिकाणी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकून पडलेल्या व्यक्तींना बाहेर काढून तात्काळ रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.

विटांखाली दाबल्याने लक्ष्मी एकनाथ मुरकुटे तथा भोईर या गंभीर जखमी झाल्या तर दीपक भोईर आणि मंगल भोईर यांनाही दुखापत झाली. त्या सर्वांना रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.

याबाबत ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी तारामती दातीर यांनी ते घरकुल नसून त्यांचे नाव घरकुल योजनेत प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगितले. तसेच तर त्या कुटुंबाला लवकरात लवकर शासनाकडून घरकुल देण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती सरपंच संजना संजय तांबोळी यांनी दिली आहे.

या अपघातात जखमी झालेल्या महिला लक्ष्मी भोईर यांची प्रकृती चिंताजनकी असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक हिब्बू जाधव यांनी दिली आहे.

Exit mobile version