| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेव मध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम या ठिकाणी एप्रिल महिन्यात निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं. आता या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा निषेध जगभरातून करण्यात आला. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन पर्वतातील कुरणावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. आता या हल्लामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेवमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी आसिफ फौजी (कोडनेम मुसा), सुलेमान शाह (युनुस) आणि अबू तल्हा (आसिफ) यांचा सहभाग होता. इतर दोन दहशतवादी आदिल गुरी आणि अहसान हे स्थानिक दहशतवादी होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ले करून 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली.







