इंदापूर बायपासचे तीनतेरा

ठेकेदार बदलला तरीही कामाची समस्या कायम

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणसह दक्षिणेकडे जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पाहिले जाते. या मार्गाच्या कामाची गेली चौदा वर्षांपासून चांगलीच रखडपट्टी सुरु असून, प्रवासी पर्यटकांना वनवास भोगावा लागत आहे.

माणगाव व इंदापूर शहराला बायपास दिला गेल्याने तळ कोकणासह गोवा व दक्षिणेकडील पर्यटकांना अंतर कमी झाल्याने कोकण व गोवादर्शन सहज घडवता येईल, अशी आशा पर्यटकांना वाटत होती. मात्र, या बायपासचे काम यापूर्वी वनखाते व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकल्याने बायपास कामाचे तीनतेरा वाजले होते.
वनखात्याची मंजुरी मिळाली मात्र, निधी अपुरा पडत असल्याने व शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले. त्यानंतर ठेकेदार बदलून सनी इंटरप्रायजेस कंपनीकडे हे काम दिले. त्यानंतरही बायपासच्या कामात व रुंदीकरणाच्या कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा आजही कायमच राहिला आहे.

हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून जातो. कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले आहे. त्यातच वैयक्तिक मालकी जमिनीच्या काही मालकांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री यांनी 3 एप्रिल 2022 रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही दिली होती. माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत या बायपास रस्त्याचे काम 2017 मध्ये सुरु झाले. हे काम 30 टक्के करण्यात आले होते. हा बायपास रस्ता सात किमीचा असून, तो माणगाव शहराबाहेरून काढण्यात आला आहे. माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून, वारंवार पर्यटक नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस घोंगडे भिजत पडले आहे.

त्यामुळे प्रवासी, पर्यटक, नागरिकांत कमालीची नाराजी पसरली आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाची गाडी धिम्या गतीने का होईना सुरु असून, त्या कामाला आणखीन म्हणावा तितकी गती मिळत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामाला गती कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version