जलजीवन योजनेचे तीनतेरा; पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट

ग्रामस्थांचा आरोप, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

| नेरळ | वार्ताहर |

जलजीवन मिशन ही योजना नागरिकांना सुखावह वाटण्यापेक्षा त्रासदायक ठरत आहे. तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील डामसेवाडीमध्ये ही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरत आहे. या योजनेच्या अंतर्गत वाडीत बांधण्यात आलेल्या जल साठवण टाकीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ती टाकी पडली तर मोठी दुर्घटना घडेल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तर या योजनेचादेखील बोर्‍या वाजल्याने वाडीतील ग्रामस्थांना एकत्र पाण्यासाठी पायपीट किंवा बाजूच्या विहिरीतील हिरवे पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या योजनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली ‘हर घर नल से जल’ ही योजना महाराष्ट्रात जलजीवन मिशन म्हणून ओळखली जाते. मात्र, मोठा गाजावाजा असलेल्या या योजनेचा बोजवारा कर्जत तालुक्यात उडाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा टँकरवर आला आहे. 2021 मध्ये सुरु झालेल्या जलजीवन मिशनच्या कामानंतर तालुका टँकरमुक्त होईल अशी असलेली आशा फोल ठरत आहे. कारण, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या योजना भर उन्हाळ्यात आटल्या आहेत. तेव्हा या योजना कोणासाठी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर कर्जत तालुक्यात दुर्गम भाग असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील डामसेवाडी येथे सुमारे 72 लाख रुपये खर्चून शासनाने जलजीवन मिशन योजना राबवली. एप्रिल 2022 मध्ये कार्यारंभ आदेश मिळाले असताना दोन वर्षांत ही योजना ठेकेदाराला पूर्ण करता आलेली नाही. तर योजना राबवताना त्याचे पाईप अनेक ठिकाणी खोलवर न टाकता वरच्यावर टाकण्यात आले आहेत. तर टाकीचे काम करताना पाण्याचा वापर नगण्य असल्याने हे काम निकृष्ट झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तर नव्या उद्भव विहिरीचा पत्ताच नाही. अशात वाडीत पाणीबाणी उद्भवली असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. तर काही अंतरावर असलेल्या विहिरीत असलेले हिरवे दूषित पाण्यावर गुजराण करावी लागते, त्यामुळे आमचा अंत किती दिवस पाहणार, असा जळजळीत सवाल ग्रामस्थ करीत आहेत. तर पुढील तीन दिवसांत जर ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही, तर योजना गुंडाळून घेऊन जा, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान, तालुक्यात काही अपवाद सोडले तर जलजीवन मिशनच्या कामात अनेक त्रुटी असल्याने योजना अडचणीत सापडल्या आहेत. तर, तालुक्यात पुन्हा एकदा 18 गावं आणि 60 वाड्यांमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या योजना ग्रामस्थांसाठी की ठेकेदारासाठी असा प्रश्‍न निर्माण झाला असून, या योजनांचा पाझर फुटणार तरी केव्हा याकडे ग्रामस्थ डोळे लावून बसले आहेत.

डामसेवाडी येथे जल साठवण टाकीचे काम करताना पाण्याचा वापर ठेकेदाराने खूप कमी केल्याने या टाकीचे सिमेंट निघत आहे. तर उद्या यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. तेव्हा ही टाकी आहे का मृत्यूचा सापळा असा प्रश्‍न आम्हाला ग्रामस्थांना पडला आहे. ही टाकी नव्याने बांधावी आणि आमची योजना सुरळीत व लवकर सुरु करावी अन्यथा या टाकीसकट ही पाईपलाईन अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे घेऊन जावी, बिल काढण्यासाठी नुसते फोटो काढायला येऊ नये.

देविदास केवारी,
ग्रामस्थ, डामसेवाडी

महिलांना पाण्यासाठी खूप त्रास होतो आहे. लांब जाऊन पाणी आणावं लागतं किंवा गावाच्या काही अंतरावर असलेल्या एका खासगी विहिरीतून पाणी आणावं लागतं. मात्र, ते पाणी हिरवं आहे. या पाण्याने काही आजार झाला तर त्याला जबाबदार कोण?

शेवंता केवारी, ग्रामस्थ

डामसेवाडी येथील टाकीचे बांधकाम व्यवस्थित झालेले आहे. फक्त त्याला फिनिशिंग केली नसल्याने ते तसे दिसते. ग्रामस्थांची तक्रार असल्याने आपण त्याचे निरीक्षण आणि तपासणीदेखील करणार आहोत. तर पाईपलाईन टाकताना काही ठिकाणी खाली खडक असल्याने पाईप लाईन खोदून टाकता आली नाही. मात्र, बाकी ठिकाणी व्यवस्थित काम झाले आहे. पाणी योजना सुरु करण्याच्या तयारीत आहोत.

अनिल मेटकरी, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, कर्जत
Exit mobile version