। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी (दि.25) सकाळी पावणेअकराच्या सुमारास दुध टँकंर (GJ-18-BV-5559) चालकाचा ताबा सुटून कार (MH-14-VQ-1072)वर उलटला. दुधाचा टँकर त्याच अवस्थेत घसरत जाऊन कंटेनर (MH-46-BB-9309)ला धडकला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुदैवाने कारमधील संकेत अतुल अग्रवाल (29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (34) राहणार खराडी-पुणे हे बचावले आहेत. उलटलेल्या कंटेनरमधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (32) राहणार मान-सातारा हा देखील किरकोळ जखमी झालेला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी, आय.आर.बी. पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आर.टी.ओ.चे अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, मृत्युंजय देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदतकार्य केले. टँकरमधील मृत चालकाचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी प्रत्यक्ष धाव घेऊन परिस्थिती हाताळली. बाधित वाहने बाजूला करुन काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.