सावरोली-खारपाडा मार्गावर तिघांचे बळी; सुरक्षेकडे दुर्लक्ष

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील मोठ्या औद्योगिक नगरीला जोडणारा महत्त्वाचा राज्य मार्ग सावरोली-खारपाडा रस्ता सुरक्षा उपयोजनाच्या अभावामुळे दिवसेंदिवस धोकादायक होत असून, मागील आठवड्यात या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या तीन लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सावरोली-खारपाडा रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत आणि त्यातच या मार्गावर असलेली धोकादायक वळणे, तीव्र उतार तसेच अपुरी साईडपट्टी यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याकडे सध्या ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. सावरोली-खारपाडा राज्य मार्ग हा खालापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या पाताळगंगा औद्योगिक वसाहतीला जोडलेला रस्ता असून, राज्य मार्गाचे एक टोक मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तर दुसरे मुंबई-गोवा महामार्गाला जोडले आहे. त्यामुळे हा रस्ता कायम वाहतुकीने व्यस्त असल्याचे दिसून येते. जवळपास 20 पेक्षा अधिक गावे, वाड्या, वस्ती या रस्त्याला जोडून आहेत. प्रवासी वाहतूक तसेच कारखान्यात ये-जा करणारी अवजड वाहनांची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते.

सदरचा रस्ता अरूंद असून, खरसुंडी, पौधनजीक घातक वळणाचा आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात, तर वानिवली गावानजीक असलेल्या कारखान्यासमोर तीव्र उताराचा रस्ता आणि लगेच अवघड वळण असल्यामुळे येथे नियमित जीवघेणे अपघात घडत असतात. या सर्व ठिकाणी कोणतेही दिशादर्शक तसेच माहिती फलक नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक किंवा रम्बलिंग स्ट्रीप्स बसविल्यास अपघातावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन ठेकेदाराकडून आवश्यक त्या उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून जीवघेणे अपघात टाळता येतील, अशी प्रवाशांची मागणी आहे.दोनच दिवसांपूर्वी सावरोली-खारपाडा मार्गावर तीव्र उतारानंतर वळणावर अनियंत्रित झालेला टँकर केळकर कंपनीसमोर झाडाला ठोकून टँकरचा चालक जागीच ठार झाला होता. तर त्याच्या दोन दिवस अगोदर बोरवली गावानजीक दुचाकीस्वार एकमेकांवर धडकल्याने दोन जण ठार, तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याशिवाय असेच अपघात सातत्याने अपघात घडत आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातांचे गांभीर्य ओळखून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम व्यवस्थित करून घेण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version