अकोल्यात चुरशीची तिरंगी लढत

| अकोला | प्रतिनिधी |

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले होते. यावेळेस मात्र प्रमुख तीन उमेदवारांमधील मतविभाजनाचे गणित निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. वंचित व काँग्रेसपुढे इतिहास बदलण्याचे, तर भाजपपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1998 व 1999 च्या निवडणुकांचा अपवाद सोडल्यास अकोला लोकसभा मतदारसंघात गत साडेतीन दशकांपासून तिरंगी लढत झाली. विविध प्रयोग करूनही स्वबळावर आंबेडकर व काँग्रेसला अद्याप यश मिळवता आलेले नाही. तिरंगी लढत नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काँग्रेसने 2014 व 2019 मध्ये अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने धर्माच्या आधारावर लढतीचे समीकरण रंगले होते. त्यात भाजपने विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त केले. आता राजकीय व जातीय समीकरणात मोठा बदल झाला आहे.

काँग्रेसने अकोल्यात मराठा समाजातील डॉ. अभय पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणे अटळ आहे. जातीय राजकारण वरचढ होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या प्रयोगामुळे यावेळेस मतदारसंघातील निवडणुकीत रंगत आली.

Exit mobile version