। पुणे । प्रतिनिधी ।
पंढरपुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन भाविक महिलांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी घडली असून यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. सुनीता सपकाळ (43) आणि संगीता सपकाळ (40) अशी दोन मृत महिलांची नावे असून एक महिला अनोळखी असल्याची माहिती मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राहणार्या दोन महिला आणि एक अनोळखी महिला शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदीत बुडू लागल्या. सोबतच्या इतर महिलांनी आरडाओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही महिला बुडल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक कोळी बांधवांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडालेल्या महिलांची शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत बुडालेल्या दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढले असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
दुर्दैवी घटना! तीन भाविक महिलांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू
