दहा जणांवर उपचार सुरू
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा परिसरातील इसांबेवाडीत अतिसाराच्या साथीने तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर लागण झालेले जवळपास दहा जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सावरोली खारपाडा मार्गावर इसांबेवाडी आहे. या वाडीतील सोहम तुकाराम वाघमारे याला उलट्या जुलाब सुरू झाले होते. यावेळी मुलाचे कुटुंब आसरेवाडी येथे वस्तीला गेले होते. तेथून रुग्णालयात जाण्यापूर्वीच सोहमचा मृत्यू झाला. सोहमच्या मृत्यूनंतर अतिसाराचे जवळपास सहा रुग्ण लोहप प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अतिसाराची साथ असल्याचे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या आरोग्य यंत्रणेने इसांबे आदिवासीवाडीत घरोघरी तपासणी मोहीम सुरू केली आहे. अतिसारांचे लागण झालेले दोन रुग्ण भिवपुरी येथील रुग्णालयात, तर दोन रुग्ण पेण येथील रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.







