“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार

येलोगेट पोलिसांनी 9 मच्छिमारांना वाचवले!

। उरण । प्रतिनिधी ।

जेएनपीटी चॅनेलच्या बाहेरील समुद्र परिसरात मासेमारीसाठी गेलेली ‘विनायक’ ही बोट अचानक संकटात सापडल्याने समुद्रात काही काळ खळबळ उडाली. बोटीच्या इंजिन रूममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने इंजिन बंद पडले आणि बोट समुद्राच्या लाटांवर हेलकावे खाऊ लागली. बोटीवरील 9 मच्छिमार समुद्रात अडकले होते. मात्र, येलो गेट पोलिसांचे पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या तत्पर मदतीमुळे सर्व 9 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

‘विनायक’ ही मासेमारी बोट बुधवारी (दि.19) दुपारी समुद्रात असताना तिच्या इंजिन रूममध्ये अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच पाण्याचे प्रमाण वाढल्याने इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ते बंद पडले. बोट समुद्रातील लाटांवर हेलकावे खाऊ लागल्याने बुडण्याचा धोका निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच मच्छिमारांनी तातडीने मदतीसाठी संपर्क साधला.

माहिती मिळताच येलो गेट पोलिसांच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक मच्छिमारांची मदत घेण्यात आली. ‘महाशांति दीप’ या स्थानिक मासेमारी बोटीने संकटग्रस्त ‘विनायक’ बोटीला सुरक्षितपणे ओढत किनाऱ्याच्या दिशेने आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर दुपारी सुमारे 2.15 वाजता सर्व 9 मच्छिमारांना भाऊचा धक्का येथे सुरक्षितपणे आणण्यात आले आणि येलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच मिळालेली मदत, पोलिसांची तत्परता आणि स्थानिक मच्छिमारांचा सहकार्यपूर्ण सहभाग यामुळे मोठी दुर्घटना टळली. समुद्राच्या मध्यभागी जीवघेण्या संकटात सापडलेल्या 9 मच्छिमारांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जेएनपीटी चॅनेल हा मोठ्या जहाजांच्या वाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील सागरी मार्ग आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जेएनपीटीचे टग्स, भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांच्या बोटी यांच्या समन्वयातून बचावकार्य राबवले जाऊ शकते.

समुद्रात जाण्यापूर्वी बोटीची तांत्रिक तपासणी गरजेची

समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी बोटीची तांत्रिक स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोटीच्या तळातून किंवा फटींमधून तसेच इंजिन रूममध्ये पाणी शिरल्यास इंजिन बंद पडून बोट प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. उधाणाची भरती, मोठ्या लाटा किंवा खराब हवामानामुळेही अशा दुर्घटना घडू शकतात.

प्रत्येक मासेमारी बोटीवर डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समीटर पुरेसे लाईफ जॅकेट्स, लाईफ बॉय आणि पाणी बाहेर उपसण्यासाठी कार्यरत बिल्ज पंप उपलब्ध असणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत मच्छिमारांनी VHF रेडिओच्या चॅनेल 16 वरून किंवा मोबाईलद्वारे तातडीने मदत मागणे गरजेचे आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी हवामान विभाग आणि इन्कोइस कडून जारी होणारे हवामान व समुद्री लाटांचे इशारे तपासणेही आवश्यक आहे.
Exit mobile version