पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात थरार; आरोपी कॅमेरात बंद

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचे दुकान आहे. त्या दुकानातील एका इसमाला त्याच्या ताब्यातील सोने खाली घेवून येत असताना दोन अज्ञात इसमांनी जबरदस्त मारहाण केली. त्याच्या डोक्यात अवजड वस्तूने मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची बॅग काढून ते मोटार सायकलवरुन पसार झाल्याची थरारक घटना घडली. त्या बॅगमध्ये जवळपास 1200 ग्रॅम सोने ज्याची अंदाजे किंमत 60 ते 70 लाख एवढी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर रावसाहेब कोळेकर यांचे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश देण्याचे दुकान असून त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी दिपेश जैन हा दुकानातील सोने बॅगेत भरुन खाली येत होता. यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्याला जिन्यामध्येच गाठून त्याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारुन सोन्याची पिशवी घेऊन मोटार सायकलवरुन पसार झाले.

यावेळी दिपेश जैन याने रक्ताच्या थारोळ्यात असतानाही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गल्लीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वपोनि अजयकुमार लांडगे, वपोनि बी.एन.कोल्हटकर, वपोनि गिरीधर गोरे, वपोनि रवींद्र दौंडकर यांच्यासह विविध पथके घटनास्थळी पोहोचली. त्या भागातील विविध दुकानात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून जखमी दिपेश जैन याला शहरातील पटेल रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version