| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन-मुंबई एसटी चालकाने मद्य सेवन केल्याने त्याला बाजुला करीत वाहक अभय कासार यांनी 60 किलोमीटर एसटी चालवल्याचे समोर आले आहे. हि घटना शुक्रवारी संध्याकाळची असून श्रीवर्धन-मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाविरूद्ध रामवाडी, पेण येथील एसटी महामंडळाच्या जिल्हा मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मद्यपि चालकास निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित केलेल्या चालकाचे नाव आबाजी धडस असे आहे. श्रीवर्धन-मुंबई हि एसटी संध्याकाळी साडेचार वाजात श्रीवर्धन येथुन निघाली. एसटी माणगाव एसटी आगारात थांबली असता चालकाने तेथेच मद्यपान केले.चालकाने मद्यपान केल्याचे कंडक्टरच्या लक्षात येताच त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क करीत सर्व माहिती आगार व्यवस्थापक यांना दिली.
संबंधीत अधिकाऱ्यांनी एसटी वाहक हा चालक असल्याने मद्यपी चालकाला बाजुला करीत वाहकाला एसटी ताब्यात घेण्यास सांगितले. पुढे सुमारे 60 किलोमिटर गाडी चालवीत रामवाडी येथे गेली असता त्याठिकाणी चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. संबधीत चालकाविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालकावर तात्काळ सेवेतून कारवाई करत निलंबित केली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मणियार यांनी सांगितले.